Friday, November 04, 2011

पानगळ

निसर्गाचा अनिवार्य नियम, जुने जाऊन नवे येणार. नव्याचे पुन्हा जुन्यात रुपांतर, आणि पुन्हा तेच चक्र.
रोज डोळ्यासमोर असलेली झाडं, हिरवीगर्द, बहरलेली, दाट पालवीने नटलेली....आज पाहिलं तर उरले होते फक्त फांद्यांचे सापळे. कालपर्यंत पानांनी झाकलेल्या फांद्याच्या आरपार आता आकाश दिसू लागलंय. हिरवी पिवळी पानं गेली कि मागे उरतं त्या अपरिहार्य सत्याचा प्रतीक.
पण त्या भकास दिसणाऱ्या झाडांनी, त्या ओझरत्या क्षणामध्ये, एक हळुवार जाणीव करून दिली. त्यातल्या प्रत्येक पानाचा झडतानाचा रंग आठवला. हिरव्यातून उमललेल्या अनेक मोहक सुंदर छटा डोळ्यापुढे आल्या. जाता जाता त्या एक एक पानाने भुरळ पाडणारं सौंदर्य धारण केलं होतं. दिलखुलास रंगांची उधळण केली होती. कित्येक दिवस सगळा परिसर सूर्यकिरणांनी न्हाऊन निघत प्रत्येक नजरेला सुखावत होता. इतकं सुरेख चित्र की कोणालाही त्या पडत्या पानाचं वाईट वाटण्याऐवजी प्रत्येक पाहणाऱ्याच आयुष्य रंगीत झाला होतं. त्या स्मृतीतच एक अलगद जाणीव होती. येणे जाणे तर अटळ आहे, कोणाला चुकले नाहीये. पण जाताना कोणी इतरांना इतका सुखावून जाऊ शकतो की त्याचा विरह वाटण्यापेक्षा त्याच्या अस्तित्वाचा अभिमान वाटावा. कोणी गेलंय म्हणून शोक करण्याऐवजी कोणी कधी आसपास होतं म्हणून उर प्रेमानं, स्फूर्तीने भरून यावा. असं आपल्याला सुद्धा जाता येईल का? राज कपूरच्या एका गाण्याचा शेवट आठवला:
                           "मरके भी किसीको याद आयेंगे, किसीकी आसुओमे मुस्कुराएगे"
                             कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसिका नाम है"

जाणारी पाने पुन्हा येतील, पुन्हा हिरवळ, पुन्हा रंग. पण प्रत्येक पडणाऱ्या पानाच्या रंगात जीवनाला दिलेलं एक वचन आहे. उद्याचा पालवीला एक प्रेरणा, बहराची उमेद, जगण्याचा ध्यास आणि येणाऱ्या ऋतूला सामोरं जाऊन पुन्हा फुलण्याचा विश्वास. पानगळीत सुद्धा हिरवळीचे बीज सामावले आहे!